नाशिक | Nashik Congress News – Municipal Election Nashik –
नाशिक महापालिका निवडणुका या वर्षी होतील की पुढील वर्षी, याबाबतचा गोंधळ अद्याप कायम असताना, काँग्रेसने मात्र निवडणुकीची तयारी झपाट्याने सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शनिवार, ५ जुलैपासून काँग्रेस भवनमध्ये सुरू होत असून, पक्षात निवडणूक फिव्हर जाणवू लागला आहे.
इच्छुकांसाठी अर्ज भरण्याची वेळ आणि ठिकाण
शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सरचिटणीस राजकुमार जेफ यांच्याकडे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत प्रभागाची माहिती आणि उमेदवाराचे परिचयपत्र जोडणे बंधनकारक आहे.
१० जुलैपासून प्रभाग बैठका सुरू (Municipal Election Nashik)
महापालिका निवडणूक पूर्वतयारी अंतर्गत १० जुलैपासून विविध प्रभागांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय अध्यक्ष, कार्यकारिणी, बूथ पातळीवरील संघटना यांची उभारणी या बैठकीत अंतिम केली जाणार आहे. तसेच शहरातील विविध ब्लॉकमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही लवकरच जाहीर होणार आहेत.
इच्छुकांची थेट चाचपणी – पक्षात नवचैतन्य
सध्या इतर पक्षांमध्ये “आयाराम-गयाराम” सुरू असताना, काँग्रेसने थेट इच्छुकांची चाचपणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पक्षात हलचाल आणि गती येण्यास सुरुवात झाली आहे.
दिल्ली बैठकीतून आलेल्या सूचनांनुसार तयारी
दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रभागनिहाय चाचपणी व पूर्वतयारीचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सर्व आघाडी विभाग आणि सेल प्रमुखांना निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
मतदारांसमोर मुद्देसूद हिशेब मांडणार
या निवडणुकीत काँग्रेस भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, स्मार्ट सिटीतील अपयश, नागरी सुविधांतील अडचणी, आणि फोडाफोडीच्या राजकारणासारखे मुद्दे घेऊन मैदानात उतरणार आहे, असे छाजेड यांनी स्पष्ट केले.