प्रतिनिधी, नाशिक: कर्नाटकातील बदलापूर येथील घटनेनंतर देशभरात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी शहरातील ३७ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अचानक ‘ऑपरेशन शाळा सुरक्षित’ मोहीम राबवली. या मोहिमेत १२२ हुल्लडबाजांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेसाठी दामिनी आणि निर्भया पथकांना तातडीने कार्यान्वित करण्यात आले. उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबईनाका आणि गंगापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष कारवाई झाली. यामध्ये गंगापूररोड आणि कॉलेजरोडवरील शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांसमोर किंवा परिसरातील कट्ट्यांवर बसून मुलींना त्रास देणाऱ्या आणि अश्लील हावभाव करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आली.
१८ वर्षांखालील मुलांकडून हमीपत्र घेतले गेले, तर युवकांच्या नाव-पत्त्यांची नोंद करून त्यांना समज देण्यात आली. पुन्हा असे आढळल्यास पालकांना बोलावून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
प्रमुख कारवाई:
- पंचवटी: २०
- आडगाव: १५
- म्हसरूळ: १६
- भद्रकाली: १८
- गंगापूर: २८
- मुंबईनाका: १६
- सरकारवाडा: २१
शहरवासीयांकडून स्वागत
शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या व्यवस्थापन आणि जागरूक पालक संघटनांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. टवाळखोरांमुळे मुलींना होणारा त्रास लक्षात घेऊन पालकांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. काही मुलींना छेडणे, अंगावरून वेगाने गाड्या घालणे, आरडाओरड करणे आणि रस्त्यात अडविण्याचे प्रकार घडत होते. या तक्रारींची दखल घेऊन तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
पोलिसांचे आवाहन
शहरातील कोणत्याही भागात टवाळखोरांकडून त्रास होत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात किंवा परिसरात टवाळखोरांवर अचानक कोणत्याही वेळी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. महिला, विद्यार्थिनींनी निर्भयपणे पोलिसांशी थेट संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक:
- पंचवटी, आडगाव, म्हसरूळ: ९४०३१६५८३०
- सरकारवाडा, भद्रकाली, मुंबईनाका: ९४०३१६५६७४
- अंबड, इंदिरानगर, सातपूर: ९४०४८४२२०६
- नाशिकरोड, उपनगर, देवळाली: ९४०३१६५१९३