नाशिक : रात्री व मध्यरात्रीच्या वेळी दुचाकीवरून फिरत एकाकी पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ९१,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे महेश ओमकार पुजारी (१९), करण रमेश डावर (१९) आणि पृथ्वी नीलेश भालेराव (२०) अशी आहेत. तिघेही जेतवननगर आणि राजवाडा परिसरातील रहिवासी आहेत.
फिर्यादी किरण देशमुख (३२) हे नाशिकरोड बसस्थानकावरून दत्तमंदिर सिग्नलच्या दिशेने मध्यरात्री पायी जात होते. याच वेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. दमदाटी व मारहाणीच्या धमक्यांखाली देशमुख यांच्याकडून ८२,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाइल व महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.
गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, विहितगाव येथील वालदेवी नदीच्या पुलाजवळ सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
सदर प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत. या टोळीने इतर ठिकाणी देखील चोरी केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.