NASHIK : बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा चोरी; आरोपीकडून ६.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik police karwai

Nashik: शहरात रिक्षा चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. चोरीच्या रिक्षांवर बनावट नंबर प्लेट लावून त्यांचा वापर करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून ६.२५ लाख रुपयांच्या सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पोहवा विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतनगर परिसरातून आरोपी रामनाथ भाऊराव गोळेसर (वय ४०, व्यवसाय- रिक्षा चालक, रा. विराज कॉलनी, कॅनडा कॉर्नर, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपीकडून एक रिक्षा जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत आरोपीने आणखी पाच चोरीच्या रिक्षांची माहिती दिली.

आरोपीकडून जप्त केलेल्या सहा रिक्षांची एकूण किंमत ६.२५ लाख रुपये आहे. या रिक्षांमध्ये मुंब्रा, अंबरनाथ, आणि कळवा पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांशी संबंधित रिक्षांचा समावेश आहे. उर्वरित तीन रिक्षांसंबंधी तपास सुरू आहे.

कामगिरीतील अधिकारी व कर्मचारी
सदर कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, तसेच पोलीस अंमलदार विशाल काठे, देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.

जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपीला अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे.