नाशिक – राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची आजपासून (१६ जून) औपचारिक सुरुवात होत असून, ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.(Nashik Education News)
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहेत. त्यांच्या सोबत खासदार, आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकारीही शाळांना भेट देतील.
शाळा प्रवेशोत्सवाचे प्रमुख ठळक मुद्दे:
विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात – शाळेच्या पहिल्या दिवशी बैलगाड्या आणि अन्य पारंपरिक वाहनातून विद्यार्थ्यांची मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विविध उपक्रमांचे आयोजन.
गणवेश, बूट व मोज्यांचे वाटप – समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या २.५३ लाख विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि मोज्यांसाठी ४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित. खरेदी व वाटपाची जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीकडे.
२८.५६ लाख मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण – पहिल्या दिवशीच ४.८८ लाख विद्यार्थ्यांपर्यंत मोफत पाठ्यपुस्तक पोहचवण्याचे उद्दिष्ट. १५ जूनपर्यंत ९९.९ टक्के पुस्तकांचे वितरण पूर्ण.
तालुकानिहाय पाठ्यपुस्तक वितरण (मुख्य तालुके):
- मालेगाव – ३,१२,७२३
- नाशिक – २,६९,३८०
- बागलाण – २,६९,३८०
- निफाड – २,६८,३०४
- दिंडोरी – २,४०,४१०
- अन्य १० तालुक्यांमध्येही नियोजनानुसार वितरण
मंत्री कोणत्या शाळांमध्ये भेट देणार?
- शिक्षणमंत्री भुसे – तुंगणदिगर (बागलाण तालुका)
- मंत्री झिरवाळ – मुंढेगाव आदिवासी आश्रमशाळा (इगतपुरी)
- मंत्री कोकाटे – जिल्हा परिषद शाळा (इगतपुरी)
शालेय शिक्षण विभागाचे नियोजन पूर्ण असून, जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव सुरळीत पार पडेल याची तयारी पूर्ण केल्याचे सांगितले.