नाशिक (सिडको) Nashik Farmer News: अंबड, सातपूर, राजूर बहुला, आडवन, पारदेवी आदी गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भूसंपादन संबंधित समस्या सोडवण्यासाठी येत्या बुधवार, ६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. ही बैठक माजी आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली आहे.
शनिवारी (दि. २६ जुलै) नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माजी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन भूसंपादनाविरोधात आपली व्यथा मांडली. या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या प्रस्तावित भूसंपादनामुळे होणाऱ्या उपजीविकेच्या संकटांविषयी चिंता व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे मुद्दे ऐकल्यानंतर बच्चू कडू यांनी तत्काळ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सामंत यांनी लगेच सकारात्मक प्रतिसाद देत ६ ऑगस्टला मंत्रालयात बैठक ठेवण्यास सहमती दर्शवली.
या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी प्रतिनिधींप्रमाणेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अन्य संबंधित घटक उपस्थित राहणार आहेत. बैठकीत भूसंपादनावर तोडगा शोधण्यासाठी खुले संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या बैठकीसाठी उपस्थित असलेल्यांमध्ये साहेबराव दातीर, शांताराम फडोळ, ज्ञानेश्वर कोकणे, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, सुरेश कोकणे आदी शेतकरी प्रतिनिधी सहभागी होते.