Nashik Fraud Case | दोन कोटी 16 लाखांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी अटक

Nashik Fraud Case | The main accused in the fraud of Rs 2 crore 16 lakhs arrested

नाशिक (Nashik Fraud Case) : आर्थिक फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात नाशिक पोलिसांनी तब्बल ₹2 कोटी 16 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आयकर विभागाने छापा टाकल्याचे खोटे कारण सांगून आणि आर्थिक अडचणीत असल्याचे भासवून तिघांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, संशयित आरोपी कुणाल गणेशभाई डेकाटे (32, रा. ऋषिराज बिल्डिंग, गंगापूर रोड) आणि रविना डेकाटे यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर तिडके (47, रा. परमोरी, ता. दिंडोरी) यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर “इन्कम टॅक्स विभागाची रेड पडली असून तातडीने पैशांची गरज आहे” असे सांगत त्यांनी आर्थिक मदत मागितली. (Nashik Fraud Case)

फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीत तिडके कुटुंबाकडून ₹65,39,140 इतकी रक्कम उकळण्यात आली. त्यापैकी केवळ ₹1,30,000 परत केले गेले, तर उर्वरित ₹64,09,140 बुडविण्यात आले.

तसेच, डेकाटे याने अशाच प्रकारे आणखी दोन जणांकडून पैसे उकळले. एकूण तिघांची ₹2,16,37,140 रुपयांची फसवणूक करण्यात आली. तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसांनी डेकाटेला अटक केली असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे करीत आहेत.