नाशिक: गरजूंच्या पोटात दोन घास सुखाचे जावेत या उदात्त हेतूने सुरू केलेली शिवभोजन Shivbhojan योजना आजही गरिबांसाठी मोठा आधार ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या या योजनेला नव्या शासनानेही चालना दिली असून, नाशिक जिल्ह्यात आता तब्बल १२३ केंद्रांमधून रोज १४,८५१ थाळ्यांचे वितरण होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
विशेषतः नाशिक शहरात ७३ केंद्रे कार्यरत असून, येथून दररोज ८,१५० थाळ्यांचे वितरण केले जाते. मजूर, बेघर आणि असंघटित कामगारांसाठी ही योजना एक दिलासा ठरली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे तीन महिने अनुदान थकले असले तरीही, केंद्रचालकांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून केंद्रे सुरू ठेवली. गेल्या आठवड्यात अनुदान जमा झाल्याने केंद्रांची कार्यक्षमता कायम आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१ केंद्रांची वाढ झाल्याने शासनाच्या या योजनेला अधिक प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसते. जिल्ह्यात सध्या १२३ केंद्रे कार्यरत असून, विविध कारणांमुळे १८ केंद्रे बंद आहेत. ही वाढती संख्या शिवभोजन Shivbhojan थाळी योजनेच्या प्रभावीपणाचे द्योतक आहे.
शिवभोजन Shivbhojan केंद्रांना मिळणारा प्रतिसाद पाहता, शासनाने या योजनेला अजून भक्कम पाठिंबा द्यावा, अशी मागणी गरजूंकडून होत आहे. या योजनेमुळे गोरगरिबांचे आयुष्य सुसह्य झाले असून, शासनाच्या या सामाजिक उपक्रमाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे.