Nashik : महायुती सरकार स्थापन झाल्यापासून राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ 12 तासांत या निर्णयाला स्थगिती दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता चर्चेचा विषय आहे नाशिक जिल्ह्यात दोन पालकमंत्र्यांची नियुक्ती होणार का?
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुंबई आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्तीने एक नवीन पायंडा पडला आहे. पहिल्यांदाच महायुतीने काही जिल्ह्यांना दोन पालकमंत्री नेमले आहेत. कोल्हापुरात प्रकाश आबिटकर (शिंदे गट) यांच्यासोबत भाजपच्या माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री आहेत, तर मुंबई उपनगरात अँड. आशिष शेलार यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकसाठी Nashik भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पालकमंत्री राहतील असे जाहीर झाले होते. परंतु, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे यांना सहपालकमंत्री बनवण्याचा दबाव आणल्याची चर्चा आहे.
नाशिक Nashik जिल्ह्यात पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महायुतीने हा नवा फॉर्म्युला आणला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर दादा भुसे यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तर नाशिक जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरेल.
सध्याच्या परिस्थितीत महाजन-भुसे जोडी कशी कार्य करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दोन्ही गटांचा समतोल राखत जिल्ह्यातील विकासकामे आणि निवडणूक रणनीती आखणे या जोडीपुढील मोठे आव्हान असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्यावर येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. जर नाशिक जिल्ह्यासाठीही दोन पालकमंत्री नेमले गेले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा अनोखा प्रयोग ठरणार आहे.