पुणा रोडवरून अपहरण, १५ लाखांची खंडणी घेतल्याचे उघड
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक प्रतिनिधी | पुणा रोड:Nashik kidnapping case: नाशिक शहरात धक्कादायक अपहरणाची घटना समोर आली असून, निकु उर्फ निखील दर्यानाणी या 30 वर्षीय तरुणाचे तीन अनोळखी इसमांनी पुणा रोड येथून अपहरण केले. बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी १५ लाख रुपये रोख स्वरूपात वसूल करण्यात आल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सुसज्ज तपास सुरू केला आहे.
पोलीस आयुक्तांची तत्काळ दखल, तपासाला गती (kidnapping case)
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासात आरोपींची ओळख पटली असून, त्यांचा माग काढण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले.
विल्होळीत पोलिसांची कारवाई, दोन आरोपी अटकेत (kidnapping case)
पोलिसांनी विल्होळी परिसरात सापळा रचून मोहम्मद अन्चर सैय्यद (30) आणि सादिक लतीफ सैय्यद (39) या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २.८८ लाख रुपये रोख, मोबाईल फोन, असा ३.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंतर्गत माहिती देणाऱ्यांची ओळख, आणखी दोन जण अटकेत
या दोघांनी चौकशीदरम्यान दिलेल्या कबुलीनुसार, निखील दर्यानाणी यांच्या भावाच्या दुकानात काम करणारे अल्फरान शेख आणि अहमद शेख यांनी अपहरणासाठी माहिती पुरवली होती. त्यांच्या मदतीने अपहरण करून खंडणी वसूल केली गेली.
या माहितीनुसार वडाळागाव परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्र. १, नाशिक शहर अंतर्गत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,
सपोनि हिरामण भोये,
पोउनि चेतन श्रीवंत,
सुदाम सांगळे,
महेश साळुंके,
आप्पा पानवळ,
राहुल पालखेडे आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मुंबईनाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.