नाशिकः नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या दोन मतदारसंघांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे. नाशिक मध्य विधानसभेची जागा शेवटी ठाकरे गटाच्या पारड्यात पडली आहे. माजी आमदार वसंत गिते यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे, तर याच जागेसाठी काँग्रेसकडून डॉ. हेमलता पाटील इच्छुक होत्या. काँग्रेसने मागील वेळी ही जागा लढवली होती, आणि डॉ. पाटील दुसऱ्या क्रमांकावर आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या जागेवरून बंडखोरी जाहीर केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि ठाकरे गट यांच्यातील चर्चेनंतर ही जागा अखेर ठाकरे गटाला देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, नाशिक पश्चिममध्ये ठाकरे गटाने जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्यासमोर भाजपच्या आमदार सीमा हिरे लढत देतील.
दोन्ही मतदारसंघांत बंडखोरीचे वारे वाहत असून, डॉ. हेमलता पाटील नाशिक मध्यमध्ये बंडखोरीसाठी सज्ज झाल्या आहेत. याचप्रमाणे, भाजपच्या माजी गटनेते दिनकर पाटील यांनीही नाशिक पश्चिममध्ये बंडखोरीची घोषणा केली आहे.