Ranji Trophy : नाशिकमध्ये रणजी ट्रॉफीची धामधूम!

Ranji Trophy matches in Nashik

Ranji Trophy : हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध बडोदा सामना (२३ ते २६ जानेवारी)

नाशिकमधील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! तब्बल सात वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रंगणार आहे. महाराष्ट्र विरुद्ध बडोदा हा चारदिवसीय सामना २३ ते २६ जानेवारीदरम्यान होणार आहे. मैदानाचे नूतनीकरण झाल्यानंतर हा पहिलाच सामना असून, प्रेक्षकांना हिरवळीच्या लॉनवर बसून मोफत सामना पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नामवंत खेळाडूंचा सहभाग

या सामन्यात भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि बडोदा संघाचा अष्टपैलू कर्णधार कृणाल पंड्या खेळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नाशिकचा स्टार खेळाडू सत्यजित बच्छाव व युवा क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी यांचाही समावेश होण्याची अपेक्षा आहे.

नूतनीकृत मैदानाची वैशिष्ट्ये

२०१८ नंतर कोरोना काळ आणि त्यानंतरच्या नूतनीकरणामुळे नाशिकमध्ये रणजी सामना होत नव्हता. आता मात्र आकर्षक हिरवळ, पॅव्हेलियन, टॉवर आणि आधुनिक ड्रेसिंग रूम्ससह मैदान सज्ज झाले आहे. मैदानाचे नूतनीकरण खेळाडूंसह प्रेक्षकांसाठीही मेजवानी ठरणार आहे.

इतिहासाची पानं उलटताना

१९५७ मध्ये नाशिकमध्ये पहिला रणजी (Ranji Trophy) सामना आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर काही वर्षे सामन्यांना खंड पडला. मात्र, २००५ मध्ये विनोद शहा यांच्या नेतृत्वाखाली गोल्फ क्लब मैदानावर रणजी सामन्यांना पुन्हा सुरुवात झाली. २०१८ पर्यंत एकूण १० सामने येथे खेळवले गेले आहेत.

सामन्याची तयारी

बीसीसीआयचे क्युरेटर मैदानाच्या तयारीसाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी मैदानाच्या स्थितीवर समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही संघ २१ जानेवारीला नाशिकमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी

प्रेक्षकांना मैदानावरील हिरवळीवर बसून मोफत सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. नाशिककरांसाठी हा सामना क्रिकेटचा सण ठरणार आहे!

(सामन्याचे वेळापत्रक: २३ ते २६ जानेवारी, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, नाशिक)