Nashik Neo Metro : नाशिकमधील निओ मेट्रो प्रकल्पावर धक्का: मोनो रेल आणि एलआरटी पर्यायांचा विचार

सुरुवातीला प्रस्तावित निओ मेट्रो हा प्रकल्प नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवण्याचे उद्दिष्ट ठेवून आखला गेला होता. परंतु, तांत्रिक अडचणी आणि प्रकल्पाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोनो रेल व एलआरटी या पर्यायांचा विचार केला जात आहे.

नाशिकमधील निओ मेट्रो (Neo Metro) प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. प्रकल्पासाठी मोनो रेल आणि एलआरटी (लाइट रेल ट्रान्झिट) यांसारख्या पर्यायांचा विचार केला जात आहे. जाणून घ्या या बदलांचा संभाव्य परिणाम.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik : देशातील पहिली टायरबेस्ड निओ मेट्रो Neo Metro साकारण्याच्या स्वप्नावर पाणी फेरण्याची चिन्हे आहेत. निओ मेट्रोऐवजी मोनो रेल आणि दोन कोच असलेल्या एलआरटी (लाइट रेल ट्रान्झिट) पर्यायांचा विचार करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे निओ मेट्रो प्रकल्पाच्या भवितव्याबाबत शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान, 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. यामध्ये राम-काल-पथ प्रकल्पासाठी ६५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून, केंद्र सरकारने यासाठी एकूण ९९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करून सुशोभीकरणाला प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नदीकाठाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थांची नियुक्ती होणार आहे. नऊ एसटीपींच्या नूतनीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

कुंभमेळ्यासाठी साधूग्रामचे नियोजन, नागरिकांची सुरक्षा, गर्दीचे व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन यासाठी सर्व विभागांनी एकत्र काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्याच्या तारखांना लक्षात घेऊन पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

2019 साली मंजूर झालेल्या निओ मेट्रो प्रकल्पाला 2021 मध्ये केंद्राकडून २१०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. मात्र, प्रकल्पासाठी आवश्यक पुढील पावले उचलण्यात आली नाहीत. आता नोएडाच्या धर्तीवर एलआरटी किंवा मोनो रेलचे तांत्रिक मूल्यांकन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्य सचिवांच्या बैठकीत या प्रकल्पांसह नाशिकच्या पायाभूत सुविधांवर सविस्तर चर्चा झाली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी संवर्धन, साधूग्राम, आणि मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब यावर भर देण्यात आला आहे.