नाशिक: Nashik Rain News नाशिकमध्ये अवघ्या ४० मिमी पावसाने शहराला पूरसदृश्य स्थितीला सामोरे जावे लागले आहे. अनेक भागांत पाणी तुंबल्याने सामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले. या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिका व स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, कामात सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
सराफ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आमदार फरांदे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि नालेसफाईच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषी यंत्रणांवर कारवाईची ताकीद दिली.
Nashik Rain News – नालेसफाई आणि मान्सून पूर्व तयारीवर गंभीर प्रश्न
पावसाआधीच झालेल्या बैठकीत नालेसफाईच्या कामांमध्ये गुणवत्ता वाढवण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात नाले, चेंबर्स आणि पावसाच्या लाईन्स प्लास्टिक व कचऱ्याने तुंबलेले असल्याचे स्पष्ट दिसून आले. यामुळे नाशिकच्या स्मार्ट सिटी योजनेतील त्रुटी आणि महापालिकेच्या अपुऱ्या तयारीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
उपस्थित अधिकारी आणि पाहणी
आमदार फरांदे यांच्या पाहणीवेळी शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, स्मार्ट सिटीचे प्रकल्पप्रमुख आशिष सूर्यवंशी, सूरज सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांना सुधारणा न झाल्यास जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमणविरोधात महापालिकेची कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने द्वारका, शालिमार, सारडा सर्कल, मुंबई नाका परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांत पाणी तुंबले असून, यामुळे महापालिकेच्या मान्सून पूर्व नियोजनातील त्रुटी समोर आल्या आहेत.
पुढील कारवाईची तयारी
आमदार फरांदे यांनी दोन दिवसांत पुन्हा एकदा पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कामात सुधारणा झाली नाही तर दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”