दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक : Nashik Ration Scam गरीब व गरजूंना मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. नाशिकच्या चौक मंडई परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्र. ६९ मधून ८३ क्विंटल धान्याचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी दोन रेशन दुकानदारांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Ration Scam – या अपहारामध्ये ३३ क्विंटल ४९ किलो गहू आणि ४९ क्विंटल ९१ किलो तांदूळ गायब असल्याचे पुरवठा विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले. दुकानातील तक्रारी वाढल्यानंतर नाशिक तालुका पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी (दि. १५) तपासणी केली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात शिधापत्रिकाधारकांना धान्य न वितरता त्याचा अनधिकृत वापर करून शासनाची फसवणूक करण्यात आली. पुरवठा विभागाचे अधिकारी विलास कनोजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात अमोल दिगंबर सदावर्ते (रा. द्वारका, नाशिक) आणि मुकुंद सुभाष पाटकर (रा. गांधी नगर, नाशिक) यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार (गुन्हा क्र. २२९/२०२५) गुन्हा दाखल झाला आहे. तसेच संबंधित दुकानांचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शिधापत्रिकाधारकांना वेळेत धान्य मिळत नसल्याने रेशन दुकानांशी वाद वाढले होते. याबाबत नागरिकांनी मखमलाबाद येथील फिर्यादी आणि पुरवठा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.