नाशिक: शेअर बाजार गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; सहा जणांना १ कोटींचा गंडा

IMG 20250116 084320

नाशिक शहरात सायबर गुन्हेगारांनी शेअर बाजारात जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा जणांना तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांना फसवले आहे. सायबर पोलिस ठाण्यात या संदर्भात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक

चंद्रकांत कमोद आणि अन्य चौघांना, सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. शेअर ट्रेडिंग व ‘आयपीओ’मध्ये गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगून १६ जून ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत ७१ लाख ४९ हजार ७४१ रुपये उकळले. या गुंतवणुकीचा कुठलाही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.

दुसऱ्या प्रकरणात २९ लाखांचा गंडा

गंगापूर रोड येथील एका व्यक्तीस व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत बनावट गुंतवणूक गटात सामील करण्यात आले. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान, त्याच्याकडून २९ लाख ८ हजार २८८ रुपये विविध बँक खात्यात वर्ग करण्यात आले. अपेक्षित नफा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी गुंतवणूक ऑफर स्वीकारताना योग्य पडताळणी करणे आणि संशयास्पद व्यवहारांपासून दूर राहणे आवश्यक आहे.