महिलेची कोट्यवधींची फसवणूक उघड: साखर निर्यात प्रकरणातील आरोपी अटकेत
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक – साखर निर्यात व्यवसायाच्या नावाखाली नाशिकमधील महिलेची तब्बल २ कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगार अमित अनंत महाडिक (वय ४३, रा. गुलमोहर कॉम्प्लेक्स, वसई विरार) याला नाशिक गुंडाविरोधी पथकाने शिताफीने अटक केली.
जानेवारी २०२३ मध्ये फिर्यादी रिता गौरव दाणी (रा. नाशिकरोड, नाशिक) यांनी साखर निर्यात व्यवसाय सुरू केला. स्टलींग पॉवर जिनेसीस कंपनी (मुंबई) यांनी श्रीलंकेत १२,००० मेट्रिक टन साखर निर्यातीची ऑर्डर दिली होती. आरोपी अमित महाडिक याने कोल्हापुरातून २० कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने २ कोटी ५३ लाख रुपये उकळले. परंतु साखर खरेदी न करता आरोपीने सहकाऱ्यांच्या मदतीने ही रक्कम हडप केली.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी आणि त्याचे सहकारी फरार झाले.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने तांत्रिक व मानवी गुप्तचर माहितीच्या आधारे आरोपी अमित महाडिक विरार (पश्चिम) भागात असल्याचा ठाव घेतला. प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून आरोपीला अटक केली.
सराईत गुन्हेगार अमित महाडिक याला आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी:
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.
संपूर्ण राज्यभरातील पोलिसांसाठी ही कारवाई आदर्श ठरली आहे.