शहर परिसरात तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटेच्या वेळी गारठा अधिक जाणवू लागल्याने नाशिककर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मदत घेण्यात येत आहे. शहरात रविवारी (दि.१०) तापमानाचा पारा १४.२ अंशांवर स्थिरावला.
देशभरातून मान्सून माघारी फिरल्यानंतर किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. विशेष करून हिमालयीन भागात पहाटेच्या तापमानात सरासरी २ ते ४ अंशांपर्यंत घट झाली. त्याचा परिणाम नाशिकच्या तापमानावर झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा १४ अंशांजवळ स्थिरावला आहे. हवेत गारठा निर्माण झाला आहे. पहाटे तसेच रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यांचे झोत वाहात असल्याने नाशिककर गारठून जात आहेत. त्यामुळे कपाटामधील उबदार कपडे बाहेर काढण्यात
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
येत आहे. दुसरीकडे पहाटेच्या वेळी शहरात धुक्याची चादर पसरत असून गुलाबी थंडीत मार्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. किमान तापमानात सरासरी २ ते ४ अंशांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वाढत्या थंडीचा फटका द्राक्षबागांना बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे द्राक्षमणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहेत
पारा घसरणार
हिमालय व वायव्य भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या हवामानावर या शीतलहरींचा परिणाम जाणवणार असून, येत्या काळात पाऱ्यात अधिक घसरण होण्याचा अंदाज आहे.