नाशिकरोड (प्रतिनिधी):* निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात माजी आमदार अनिल कदम यांनी नाशिकरोड वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांच्या समोर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन देत कदम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बाबत शेतकऱ्यांनी अनिल कदम यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त करत, अधिकाऱ्यांना तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील आठवड्यात वीज वितरण कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा कदम यांनी दिला.
महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली. कदम यांनी कंपनीच्या अनागोंदी कारभारावर कठोर भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र पुढील आठवड्यातही समस्या न सुटल्यास कदम यांनी अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.