नाशिक – महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सॅप ईआरपी प्रणालीच्या देखभालीसाठी नियुक्त मक्तेदार कंपनीचे बिल थकल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. संबंधित कंपनीचे कर्मचारी १ जानेवारीपासून कामावरून हटल्याने वेतन, बिले आणि अन्य आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे कर्मचारी आणि ठेकेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महापालिका NMC आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात झेन्सॉर कंपनीला सॅप ईआरपी प्रणालीच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, कंपनीच्या थकीत बिलांमुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. आयटी विभागाने तात्पुरते उपाय म्हणून दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असली तरी त्यांना या प्रणालीचे पुरेसे ज्ञान नसल्याने काम सुरळीत होत नाही.
काम ठप्प, वेतन रखडले – हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर संकट
सॅप प्रणालीद्वारेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन आणि ठेकेदारांचे बिले प्रक्रिया केली जातात. साधारणतः १ तारखेला वेतन होत असते. मात्र, या महिन्यात २० तारीख उलटली तरी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी मोठी अडचण येत आहे.
ठेकेदारांनाही फटका
महापालिकेच्या NMC विविध प्रकल्पांसाठी नियुक्त ठेकेदारांचे बिलेही या प्रणालीच्या अभावामुळे अडकली आहेत. अनेक ठेकेदारांनी आपल्या कामकाजाला ब्रेक लावण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे विकास प्रकल्पांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
नवीन उपाययोजना अनिवार्य
आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला NMC त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे. झेन्सॉर कंपनीची देयके त्वरित अदा करणे किंवा पर्यायी उपाययोजना राबवून सॅप प्रणाली पूर्ववत सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा, महापालिकेच्या कामकाजाचा गाडा पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाशिककरांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, महापालिकेची भूमिका कशी असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.