नांदेड: नांदेड तालुक्यातील नेरली गावात ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी प्यायल्यामुळे संपूर्ण गावात आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. गावातील नागरिकांना अचानक मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सायंकाळी सहा वाजता काही नागरिकांना त्रास जाणवू लागला होता, परंतु मध्यरात्रीपर्यंत ही संख्या वाढून 300 हून अधिक नागरिकांना शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
सध्या नेरली गावात आरोग्य पथक तळ ठोकून असून, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अजूनही काही नागरिकांना त्रास जाणवू शकतो.
गावात पाण्याचा तात्पुरता पुरवठा बंद करण्यात आला असून, पुढील दोन ते तीन दिवस गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. आमदार बालाजी कल्याणकर आणि अन्य राजकीय नेते तातडीने गावात पोहोचून नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
सध्या प्रशासन आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.