नाशिक panchavati Crime : पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, दोन गटांमधील वाद विकोपाला जाऊन हवेत गोळीबार करण्यात आला. रविवारी रात्री गणेशवाडी आणि हिरावाडी परिसरात वर्चस्ववादातून दोन टोळ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. धारदार शस्त्रांचा वापर करत काही जणांना जबर मारहाण करण्यात आली, तर एका गटाने हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
रहिवासी भयभीत, पण पोलिसांचा दुर्लक्ष?
या घटनेने पंचवटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून सूत्रधारांना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला हा किरकोळ वाद असल्याचे सांगत दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. सोमवारी अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अवैध व्यवसाय व खंडणीचा संबंध?
स्थानिक रहिवाशांच्या मते, या गुन्हेगारी घटनांमध्ये माजी नगरसेवकाच्या पतीसह काही सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याने नागरिक तक्रार देण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
Panchvati crime गुन्हेगारीवर नियंत्रण कधी?
गेल्या काही महिन्यांपासून पंचवटीत वाहन चोरी, हल्ले, खंडणीसाठी धमक्या आणि दहशतीच्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे.
पोलिसांकडून तपास सुरू, पण अटक अद्याप नाही
या प्रकरणी संशयितांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असून, तपास पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. नागरिकांमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.