नाशिक | Panic Button in Maharashtra Jails– महाराष्ट्रातील सर्व ६० कारागृहांमध्ये आता ‘पॅनिक बटन’ (Panic Button) बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संकटसमयी त्वरित मदत मिळवण्यासाठी आणि कोठडीत होणारे कैद्यांचे मृत्यू रोखण्यासाठी ही महत्त्वपूर्ण यंत्रणा बसवली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारने हा तपशील सादर केला.
पार्श्वभूमी: याचिका व न्यायालयाचे निर्देश
२००८ मध्ये दाखल झालेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने कारागृहातील बंदिवानांना पुरेशी सुविधा देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. यानंतर सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन, सीसीटीव्ही बसविणे आणि आता ‘पॅनिक बटन’सारखे आधुनिक अलर्ट सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला.
पॅनिक बटन कसे काम करेल?
वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्वरित माहिती मिळेल.
प्रत्येक बराकमध्ये ‘पॅनिक बटन’ बसवले जाईल.
हे एक अलार्म डिव्हाइस असून, त्याचे कंट्रोल रूमशी थेट कनेक्शन असेल.
कैद्याने बटन दाबताच कंट्रोल रूमला अलर्ट मिळेल.
‘क्विक रिस्पॉन्स टीम’ लगेच घटनास्थळी रवाना होईल.
कैद्यांच्या आरोग्याची गंभीर स्थिती
२०२१ च्या आकडेवारीनुसार, राज्यातील कारागृहात एकूण १०,८८४ कैदी गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत – हृदयरोग (१५०५), किडनी आजार (५१७), एड्स (४३०), क्षयरोग (४१२), कॅन्सर (८०) आणि इतर आजार. त्वचेच्या आजारांचे प्रमाणही मोठे असून, २०२१ मध्ये ५,८६६ कैद्यांना संसर्ग झाला.
कैद्यांची संख्या व नवीन कारागृहे (Panic Button in Maharashtra Jails)
राज्यातील कारागृहांची क्षमता २६,३७७ इतकी असताना सध्या ४०,४८५ कैदी बंदिस्त आहेत. या ओव्हरक्राउडिंगमुळे भांडणे, टोळीयुद्ध आणि मृत्यूच्या घटना घडत आहेत. यावर उपाय म्हणून १५ हजार कैद्यांना सामावून घेणारी १३ नवीन कारागृहे उभारण्याचे काम सुरू आहे.
पुण्यातील संस्थेकडून पॅनिक बटन पुरवठा
पुण्यातील एका इन्स्टिट्यूटमार्फत राज्यातील सर्व कारागृहांना पॅनिक बटन पुरवले जाणार आहेत. गृह विभागाने दरपत्रक व आवश्यक संख्येची माहिती संस्थेला दिली असून, शासन निधी मिळाल्यानंतर तातडीने बसवणी केली जाईल.