Prayagraj महाकुंभातील चेंगराचेंगरी: संगम घाटावर भगदाड, अमृत स्नान रद्द
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Prayagraj , २९ जानेवारी: मौनी अमावस्येच्या पवित्र दिवशी संगमावर मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांमध्ये अचानक गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे महाकुंभाच्या दिव्य सोहळ्याला गालबोट लागले असून, अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
भाविकांच्या गर्दीचा ताण, बॅरिकेट्स कोसळले
मेळ्यात विशेष कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आकांक्षा राणा यांनी सांगितले की, “भाविकांची गर्दी वाढल्यानंतर बॅरिकेट्स तुटले, त्यामुळे काही लोक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्या नेमक्या संख्येबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.”
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक झालेल्या धक्काबुक्कीत अनेक भाविक खाली पडले आणि गर्दी अनियंत्रित झाली. “आम्ही दोन बसने ६० जणांच्या गटात आलो होतो. अचानक गर्दीत प्रचंड धक्काबुक्की सुरू झाली आणि आम्ही त्यात अडकलो,” असे कर्नाटकातील सरोजिनी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
अमृत स्नान रद्द, प्रशासनाचे भाविकांना आवाहन
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आखाडा परिषदेने आजचे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने भाविकांना संगम घाट टाळण्याचे आवाहन केले असून, पर्यायी घाटांवर स्नान करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा तातडीचा संवाद
घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आणि मदतीचे निर्देश दिले. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
१० कोटी भाविकांची उपस्थिती, सुरक्षेचे कडक उपाय निष्फळ?
मौनी अमावस्या हा गंगेत स्नान करण्याचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो, त्यामुळे सुमारे १० कोटी भाविक संगमावर स्नान करण्यासाठी येण्याची अपेक्षा होती. गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने वाहने नसलेले झोन आणि कडक निर्बंध लागू केले होते, मात्र तरीही ही दुर्दैवी घटना घडली.
प्रशासनाने सांगितले की, घटनेचा सखोल तपास सुरू असून, सुरक्षेतील त्रुटींची चौकशी केली जाईल. भाविकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.