नाशिक, महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेत, विद्युत भवनावर आक्रोश मोर्चा काढला. मीटर रिडींग न घेता सरासरी पद्धतीने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारण्याचा आरोप या मोर्चादरम्यान करण्यात आला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मालेगाव व नाशिक परिमंडळातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना २०१४ पासून चुकीची वीज बिले आकारली जात असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या वीज मीटरचे रिडींग न घेता, सर्वसाधारण पद्धतीने बिले तयार करून त्यांना वीज वापराच्या अनुपातात नसलेली मोठी रक्कम भरण्यास भाग पाडले जात आहे. ५ गुंठे ते १० एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना एकसारखीच रक्कम आकारली गेल्याची तक्रार आहे.
याआधी ४७ शेतकऱ्यांना १४ लाख रुपये वीज बिल आकारले गेले होते. त्यांच्या मागणीनंतर बिल दुरुस्त करण्यात आले. मात्र, पुन्हा तशाच प्रकारे चुकीची बिले पाठवली जात आहेत. महावितरणच्या मुख्य अभियंत्याशी या समस्येवर मागील महिन्यात चर्चा झाली होती, परंतु अजून कोणतेही समाधान मिळालेले नाही. त्यामुळे शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत आक्रोश मोर्चा काढला होता.
मोर्चाची सुरुवात नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शहराध्यक्ष गजानन शेलार, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाना महाले, छबू नागरे, गोकुळ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको सिग्नल मार्गे हा मोर्चा विद्युत भवनावर धडकला. यावेळी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चात शहर जिल्हा सरचिटणीस अंसारी, अशोक पाटील मोगल, अशोक पाळदे, सचिन आहेर, संजय गालफाडे, समाधान कोठुळे, जगदीश गोडसे, श्याम भोसले, अतुल मते, सुनील कोथमिरे, जयंतकुमार आहेर, विजय गवळी, नामदेव गोपाळ, दर्शन लढ्ढा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता एन टी काळे यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोर्चेकरू मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनाच निवेदन द्यायचे यावर ठाम होते. कुमठेकर यांचा तोंडादेखला निषेध मोर्चेकऱ्यांनी केला, कारण मोर्चाचा सामना करण्याऐवजी ते स्वतःच्या दालनातून निघून गेले होते. यामुळे मोर्चेकरांनी विद्युत भवनात बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.