नाशिक (प्रतिनिधी) Radhakrishna Vikhe-Patil News: हनी ट्रॅप प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे मत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्टपणे मांडले. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि चौकशी थांबवण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
उल्हास-वैतराणा नदीजोड प्रकल्प कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी (दि. ३ ऑगस्ट) सिंचन भवन, नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी हनी ट्रॅप प्रकरण, निळवंडे धरण, संजय शिरसाठ, खडसे प्रकरण, रोहित पवार यांचे ट्विट, तसेच मालेगाव बॉम्बस्फोट यासह विविध मुद्यांवर परखड मत व्यक्त केली.
हनी ट्रॅप प्रकरण: सखोल चौकशी आवश्यक
“हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. ही चौकशी कोणी थांबवलेली नाही. याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,” असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
निळवंडे धरणावरून राजकीय टीका (Radhakrishna Vikhe-Patil News)
“निळवंडे धरणाचे तीन वेळा भूमिपूजन करण्यात आले, हे केवळ विखे-पाटीलांचा विरोध दर्शवण्यासाठीच. राजकारणामुळे हे प्रकल्प तब्बल ३५-४० वर्षे रखडले. अखेर महायुती सरकारच्या प्रयत्नांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यामुळे जनतेमध्ये समाधान आहे,” असे त्यांनी नमूद केले.
रोहित पवार व संजय शिरसाठ प्रकरणावर प्रतिक्रिया
“रोहित पवार यांच्याकडे कोणतेही काम नाही, म्हणूनच ते ट्विट करत बसतात. लोकांच्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे.”
संजय शिरसाठ प्रकरणावर ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता पाळा असे स्पष्टपणे बजावले आहे.”
धरणाचे पाणी आणि स्थानिक प्राधान्य
विखे-पाटील म्हणाले, “निळवंडे धरणाचे पाणी मुंबईला जाणार आहे. मात्र, स्थानिकांना देखील त्याचा योग्य लाभ मिळाला पाहिजे. अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाणी मिळत नाही, त्यामुळे पाणी वापरावर बंधने गरजेची आहेत.”
‘सनातनमुळेच धर्म टिकून आहे’ – विरोधकांवर टीका
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर विखे-पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “पृथ्वीराज चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड हे बिनबुडाचे आरोप करत आहेत. सनातनमुळेच धर्म टिकून आहे, हे त्यांनी समजून घ्यावे,” असे ते म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांची पाठराखण
“माणिकराव कोकाटे माझे जुने मित्र आहेत. नाशिककरांना त्यांच्या स्वभावाची कल्पना आहे. बाहेरचे लोक चुकीचा अर्थ काढून टीका करतात, हे अयोग्य आहे,” असे सांगून विखे-पाटील यांनी कोकाटेंची पाठराखण केली.