मुंबई: जगाने एक अमूल्य रत्न गमावले आहे, ज्येष्ठ उद्योजक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण भारत शोकमग्न झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या निधनाला भारतीय उद्योग क्षेत्रासाठी अपरिमित हानी असल्याचे नमूद केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
रतन टाटा हे फक्त उद्योग क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व नव्हते, तर त्यांची उदारमतवादी विचारसरणी, समाजासाठी असलेली अढळ बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाने ते एक अतुलनीय आदर्श होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, टाटा ग्रुपने मिठापासून ते विमानापर्यंतचा व्यवसाय केला, परंतु त्यांच्या प्रत्येक उपक्रमात मानवता ही केंद्रस्थानी होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले की, रतन टाटा यांनी टाटा या नावावर असलेला विश्वास आणखी दृढ केला आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे उद्योजकांच्या अनेक पिढ्या प्रेरित झाल्या आहेत.
मुंबई आणि टाटा परिवारातील नातेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले, कारण रतन टाटा यांनी मुंबईसाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या कार्यामुळे ते नेहमीच आदरणीय राहिले आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय समाजाच्या आणि उद्योग क्षेत्राच्या पायाला खिळ बसली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारांना शासकीय इतमामाने करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थनाही केली आहे.