नाशिक, साईनाथनगर चौफुली लगत असलेल्या जॉगिंग ट्रॅक परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीच्या मोठ्या जाळ्याचा भांडाफोड करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. ६) पहाटे तीन वाजता पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून सुमारे ६१.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची किंमत तब्बल तीन लाख रुपये आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या कारवाईनंतर आरोपी, सदाशिव ऊर्फ शिवपाराजी गायकवाड (३४, रा. म्हाडा, वडाळागाव) याला पोलिसांनी अटक केली. गायकवाड हा नाशिकच्या अंमली पदार्थविक्रीच्या साखळीतील मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असून, तो एक सराईत गुन्हेगार आहे.
गायकवाडवर इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोन, भद्रकाली, उपनगर, आणि घोटी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक अशा सहा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. वडाळा परिसरात त्याचा मोठा दबदबा असून, अनेक गुन्ह्यांचा तो मास्टरमाईंड मानला जात आहे.
अजय भिका राधकर, अल्ताफ पीरण शहा, मोहसीन हानिफ शेख, आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ या चौघांना आधीच अटक करण्यात आली होती. गुरुवारी या सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. एमडी ड्रग्जच्या सप्लायर चेनशी संबंधित काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची अपेक्षा आहे. पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून, या कारवाईने नाशिकमधील अंमली पदार्थांच्या जाळ्यावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.