मुंबई – भारतीय शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) मोठी कारवाई करत चार स्टॉक ब्रोकर्सची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. यात सिंगल विंडो सिक्युरिटीज, सननेस कॅपिटल इंडिया, जीएसीएम टेक्नॉलॉजीज आणि इन्फोटेक पोर्टफोलिओ या ब्रोकर्सचा समावेश आहे. सेबीने (SEBI) दिलेल्या माहितीनुसार, या ब्रोकर्सनी आवश्यक प्रक्रियेचे पालन केले नसल्यामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गैरवापर रोखण्यासाठी निर्णय
शेअर बाजार बंद झाल्यानंतर २९ जानेवारी रोजी सेबीने हा निर्णय घेतला. सेबीने (SEBI) चार वेगवेगळे आदेश जारी करत या ब्रोकर्सची नोंदणी रद्द केल्याची माहिती दिली. या ब्रोकर्सना मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजचे सदस्यत्व मिळवणे आवश्यक होते, मात्र त्यांनी ते केले नाही. त्यामुळे सेबी नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर टाळण्यासाठी आणि अज्ञात गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
जवाबदारी कायम
नोंदणी रद्द केल्यानंतरही या कंपन्यांची जबाबदारी कायम राहील. स्टॉक ब्रोकर म्हणून केलेल्या कोणत्याही गैरव्यवहारासाठी त्या उत्तरदायी असतील, तसेच सेबीची थकबाकी आणि व्याज चुकते करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.
ब्रोकर्सच्या अटींचे उल्लंघन
सेबीच्या (SEBI)आदेशानुसार, या चार कंपन्यांना ठरावीक अटींवर नोंदणी देण्यात आली होती. त्यातील प्रमुख अट म्हणजे त्यांना मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजचे सदस्यत्व मिळवणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ब्रोकर्स रेग्युलेशन १९९२ अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांच्या नोंदणीवर गदा आली आहे.
शेअर बाजारातील पारदर्शकता महत्त्वाची
सेबीने शेअर बाजारातील पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. चारही कंपन्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांना स्टॉक एक्सचेंजने सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले आहे.
या घटनेमुळे शेअर बाजारातील नियम आणि पारदर्शक व्यवहारांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. गुंतवणूकदारांनीही ब्रोकर निवडताना अधिक जागरूक राहण्याची गरज आहे, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे.