नाशिक: शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू असून, उर्वरित खड्डे (Pothole) महिनाभरात बुजवले जातील, अशी माहिती नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी तसेच नाशिक पूर्व-पश्चिम भागात अपूर्ण रस्ते कामे लवकरच पूर्ण केली जातील.
रस्ते दुरुस्तीचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या असून, कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. यासोबतच एमएनजीएलने खोदलेल्या रस्त्यांवरील खड्डे (Pothole) बुजविण्याचे आदेश देण्यात आले असून, विनापरवानगी रस्ते खोदणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल.
पावसाळा संपूनही अनेक रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मनपाने ५० कोटी रुपयांची निधी मंजूर केला असला तरी, अद्याप अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
शहरातील वारंवार होणाऱ्या रस्ता खोदाईस आळा घालण्यासाठी जीआयएस आधारित प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. मात्र, यासाठी काहीसा कालावधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी व्यापक योजना आखली असून, महिनाभरात नाशिक खड्डेमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत ही कामे वेगाने पूर्ण केली जातील, असा मनपाचा दावा आहे.