दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सांगली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी रेवडी संस्कृतीवर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लाडकी बहीण योजना’वर टीका केली आहे. सांगली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही योजना महिलांसाठी फायदेशीर असली तरी यामुळे इतर सरकारी योजनांच्या निधीचे वितरण थांबले असल्याचा आरोप केला.
पवार म्हणाले, “लाडकी बहीण योजनेमुळे अनेक सरकारी योजनांचे पैसे वळते करण्यात आल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवरही नियंत्रण ठेवण्यात आले आहे. मिरजेतील कर्करोग रुग्णालयाचे ४ कोटी रुपये थकीत असून, राज्यातील आरोग्य योजनेसाठी सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे.”
महिला सुरक्षेवर लक्ष देण्याची गरज
“लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत होते, याचे स्वागतच आहे. मात्र, महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपचे नितेश राणे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विधानांवर खोचक टीका करत पवार म्हणाले, “जर संस्कारच नसतील, तर काय करणार?”
नितीन गडकरी यांचे कार्य कौतुकास्पद
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, “गडकरी बऱ्याच वेळा त्यांना योग्य वाटते ते बोलतात, भले ते सरकारविरोधी असले तरी. त्यांच्यामुळे रस्त्यांची कामे चांगली झाली असून, विकासाला त्याचा फायदा होत आहे.”
मराठी भाषेला अभिजात दर्जा, मात्र मराठी शाळांचा प्रश्न गंभीर
“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, याचे समाधान आहे. मात्र, आज मराठी शाळा बंद पडत आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांनी मराठी शाळेत प्रवेश घेतला नाही, तर याचा परिणाम शिक्षकांवर होईल,” असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण मर्यादा ७५ टक्के करण्याची मागणी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले, “तमिळनाडूमध्ये जर ७८ टक्के आरक्षण दिले जात असेल, तर महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा ७५ टक्के करायला हवी. केंद्राने पुढाकार घेतल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ.”
प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला उत्तर
प्रकाश आंबेडकर यांच्या “मराठा आरक्षणाचा पहिला बळी शरद पवार” या टीकेबाबत विचारले असता, पवार म्हणाले, “मग त्यांचा लोकसभेला एकही उमेदवार का विजयी झाला नाही? ते केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात,” असे उत्तर त्यांनी दिले.