उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद

**Dialogue between Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Literary Figures**

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी प्रेमींच्या भावना उंचावल्या असून साहित्य, कला, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला आहे.

शुक्रवारी मुंबईत या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेतली. यामध्ये राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, प्रसिद्ध लेखक शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री नामदेव कांबळे, कवी प्रवीण दवणे, संगीतकार कौशल इनामदार, गायिका वैशाली सामंत, अभिनेत्री मधुरा वेलणकर, कवी दुर्गेश सोनार, आणि प्रा. लतिका भानुशाली यांचा समावेश होता.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने खऱ्या अर्थाने साहित्यिक, कलावंत, आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान झाला आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असून, त्यांचे आभार मानावेसे वाटतात.”

त्यांनी पुढे सांगितले की, “आपली मराठी भाषा शतकानुशतकं प्रेरणा, शौर्य, करुणा, आणि सृजनशीलतेचा स्त्रोत राहिली आहे. आता हा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. मराठी केवळ संवाद साधण्याची भाषा न राहता, ती ज्ञानाची भाषा कशी होईल, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.”

मराठी भाषेच्या प्रसार आणि विकासासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. “आता आपल्याला एकत्र येऊन मराठीला आधुनिक युगात ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना उपस्थित सर्व साहित्यिक, कलावंत आणि मराठी प्रेमींनी आपला आनंद व्यक्त केला आणि मराठी भाषेच्या अधिकाधिक विकासासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार केला.

Leave a Reply