उदय सामंतांचा धक्कादायक खुलासा
Uday Samant: राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “ऑपरेशन टायगर हे नाव आम्ही ठेवलं नाही, मीडियानेच त्याला हे नाव दिलं आहे. मात्र दोन दिवसांत पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत,” असे विधान करत त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Uday Samant कोणत्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश?
शिंदे गटात कोण प्रवेश करणार? आणि कोणत्या पक्षाला मोठा धक्का बसणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरे गटातील नेते एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे. “हे सर्व कोणत्याही ऑपरेशनशिवाय होत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
“शरद पवार हस्तक्षेप करत नाहीत” – उदय सामंत (Uday Samant)
महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला होता, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार इतर पक्षांत हस्तक्षेप करत नाहीत. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्री बनवण्यासाठी शिंदे यांना सांगितले की, पवारसाहेब तुमच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करत आहेत.“
राहुल गांधींवरही निशाणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, “ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि महापुरुषांची महती माहीत नाही, त्यांना आम्ही शिकवावं ही दुर्दैवाची गोष्ट आहे.“
महामानवांवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा – सामंत
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महामानवांवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा,” असेही उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अभिनेता कमाल खानच्या ट्विटमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
पुढील दोन दिवस महत्त्वाचे
राजकीय वर्तुळात सध्या शिंदे गटाच्या संभाव्य इनकमिंगची चर्चा रंगली आहे. उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यानंतर आता कोणते नेते शिंदे गटात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकारणातील हा भूकंप किती मोठा असेल, हे पाहण्यासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.