मुंबई,: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल रु. 4892 असा जाहीर करण्यात आला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत रु. 292 ने अधिक आहे. राज्यातील खरीप हंगाम 2024-25 साठी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाल्याने, हा हमीभाव शेतकऱ्यांना चांगला दिलासा देणारा आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढणार
राज्यातील सोयाबीन पिकाची खरेदी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) यांच्या सहकार्याने 26 जिल्ह्यांतील एकूण 256 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 242 केंद्रे कार्यान्वित झाली असून लवकरच उर्वरित केंद्रेही कार्यान्वित होणार आहेत. राज्य शासनाने खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे सूतोवाच केले आहे, ज्यामुळे अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनचे विक्री व्यवस्थापन सुलभ होईल.
शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू
सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून, आतापर्यंत 5000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीन पिकाची योग्य किंमत मिळावी, यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन खरेदीची योजना राबवली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी, शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 उतारा, आधारकार्ड आणि बँक पासबुकसह नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन पिकाची नोंदणी करावी.
शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा मिळणार
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ पणन महासंघ यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किमतीवर केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनचे योग्य मूल्य मिळण्याची खात्री आहे. राज्य सरकारच्या या योजनेमुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. राज्य शासनाने केलेल्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.