मुख्याध्यापक माणिक बच्छाव यांच्यावर गंभीर आरोप
Surgana : तालुक्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प कळवण अंतर्गत शासकीय आश्रम शाळा आंबुपाडा (बे) येथे मुख्याध्यापक माणिक बच्छाव यांच्यावर रोजंदारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पिडीत महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर फरार झालेल्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Surgana : मद्यप्राशन करून महिलांशी अश्लील वर्तन
मुख्याध्यापक बच्छाव हे रात्री अपरात्री मद्यप्राशन करून रोजंदारी महिलांशी असभ्य आणि लज्जास्पद भाषेत संवाद साधत होते. तसेच त्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्या विरोधात तक्रारी कळवण प्रकल्प कार्यालयात दाखल झाल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
अनुसूचित जमातीच्या महिलेवर अन्याय
पीडित महिला अनुसूचित जमातीची असल्याने संबंधित प्रकरण गंभीर बनले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकाविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गेल्या दोन दिवसांपासून फरार होता, मात्र बा-हे पोलीस पथकाने बुधवारी नाशिक पेठरोडवरील मेघराज बेकरी समोरील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
पोलीस यंत्रणेची सक्रियता
या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.टी. मेघा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे करीत आहेत.
शाळेतील वातावरण वादग्रस्त
शासकीय आश्रम शाळा आंबुपाडा (बे) ही मागील दोन-तीन वर्षांपासून विविध आरोपांमुळे वादग्रस्त ठरत आहे. पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी शाळेतील वातावरण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम करत असल्याची तक्रार केली आहे.
तात्काळ निलंबनाची मागणी
भारतीय आदिवासी दलित पँथरचे उपाध्यक्ष प्रा. तुळशीराम खोटरे यांनी संबधित मुख्याध्यापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रकारांना हाकलून देण्याचा प्रकार
या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी गेटच्या बाहेर हाकलून देण्याची भाषा केली. यामुळे प्रशासनावरही टीका होत आहे.