दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भुसावळ विभागात १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अभियानाची थीम ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अशी ठेवण्यात आली आहे. या कालावधीत स्वच्छतेसंबंधी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१ ऑक्टोबर रोजी या पंधरवड्याची सुरुवात नाशिक स्टेशन येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. भुसावळ विभागीय रेल्वे कार्यालयात अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन यांनी देखील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.
विभागातील सर्व स्थानक, कोचिंग डेपो, कार्यालये, रेल्वे शाळा, आणि क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थान, भुसावळ येथील सर्व कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. तसेच, रेल्वे प्रवाशांनाही स्वच्छतेबाबत जागरूक करण्याचे काम करण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्वच्छता मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचा नाशिक स्टेशन तपासणी दौरा
स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी नाशिक स्टेशन येथे तपासणी दौरा केला. त्यांनी स्टेशन परिसरातील स्वच्छता, बुकिंग ऑफिस, आणि आरपीएफ ट्रेनिंग सेंटर या ठिकाणांचे निरीक्षण केले. यावेळी प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
तसेच, स्टेशन परिसरातील विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांची सखोल पाहणी करण्यात आली. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचीही तपासणी करून त्यात अधिक सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विशेषत: प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी कामांना जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या निरीक्षण दौऱ्यात संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.