जनतेच्या मनाचा ठाव घ्या, महायुतीचा धर्म जपा” – पंतप्रधान मोदींचा मंत्र

IMG 20250116 073652

मुंबई : “जनता बोलत नाही, पण ती पाहते,” हा साधा परंतु प्रभावी संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीतील आमदार आणि मंत्र्यांना दिला. आयएनएस सभागृहात आयोजित दोन तासांच्या बैठकीत मोदी यांनी विकास, प्रशासन आणि जनसंपर्क यावर सखोल संवाद साधला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

चांगली प्रतिमा ठेवा, बदल्यांचे राजकारण थांबा
“सत्ताधाऱ्यांसाठी पैसा नाही, तर चांगली प्रतिमा महत्त्वाची असते,” असे सांगत मोदी यांनी बदल्यांच्या फायली घेऊन वायफळ वेळ घालवू नका, असा स्पष्ट इशारा दिला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी बदल्यांच्या फायलींचे राजकारण थांबवले, त्याचा उल्लेख करत मोदींनी त्यांचा स्वतःचा अनुभव शेअर केला.

योग आणि आरोग्याचा कानमंत्र
सत्ताधाऱ्यांनी योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेचा दिनक्रम तयार करावा. व्यसनांपासून दूर राहून वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करण्याची शिफारस मोदींनी केली. “राजकारणाबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्यही महत्त्वाचे,” असे ते म्हणाले.

संघर्ष नव्हे, समन्वय हवी
“कायदे आमदारांचे काम, अंमलबजावणी नोकरशाहीचे काम,” असे सांगत संघर्ष न करता नोकरशाहीसोबत समन्वय साधण्याचा सल्ला त्यांनी दिला.

राधे मदन मोहन मंदिराचे लोकार्पण
खारघर येथील इस्कॉनच्या राधे मदन मोहन मंदिराचे लोकार्पण करताना मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख “देवाभाऊ” असा केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले चालेल, असा विश्वास व्यक्त केला.

“घराचा आधार आधी ठेवा”
कुटुंबाला वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित करत मोदींनी मंत्र्यांना विचारले, “तुमच्या मुलींशी संवाद साधता का?” तुमचा रोल मंत्री म्हणून महत्त्वाचा असला तरी तुम्ही कुटुंबाचा आधार आहात, हे विसरू नका.

नवीन दृष्टिकोनाची गरज
काँग्रेसच्या काळातील निवडणूक प्रचाराची चिरपरिचित शैली उघड करत मोदी म्हणाले, “आधी रस्त्याचे आश्वासन, नंतर प्रस्ताव आणि शेवटी काम,” अशा पद्धतींना जनतेने नाकारले आहे. आता गावे, खेडी पाहून थेट संवाद साधण्याची गरज आहे.

महायुतीच्या सर्व नेत्यांना साधेपणाने वागण्याचा आणि जनतेच्या मनाचा ठाव घेण्याचा मंत्र देत, मोदींनी यशाचा मूलमंत्र स्पष्ट केला.