शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद पदी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्यानंतर लगेच रमेश बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व ५७ आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. यावेळी सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपद्वारे दिला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या व्हिपमध्ये शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश आहे, असं मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपमध्ये म्हटलं आहे. रमेश बोरनारे हे वैजापूरचे विद्यमान आमदार आहेत. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील याच मतदारसंघातून निवडून आले होते. रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. शिदि यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं त्यावेळी रमेश बोरनारे यांनी त्यांना खमकी साथ दिली होती. गुवाहाटीला जाणाऱ्या ४० शिवसेनेच्या आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचादेखील समावेश होता.