मंत्रालयात आदिवासी आमदारांचा ठिय्या; राज्यभर आंदोलनाचा इशारा
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मंत्रालयात आदिवासी समाजाच्या आमदारांनी पेसा भरती आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. झिरवाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
“आम्ही आधी आदिवासी आहोत आणि नंतर विधानसभेचे उपाध्यक्ष,” असे सांगत झिरवाळ यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी पेसा भरतीचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, अशी मागणी केली असून, या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा प्लॅन बी तयार असल्याचे झिरवाळ यांनी सूचित केले आहे. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलक आमदारांनी केली आहे.
राज्य सरकारने या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास आदिवासी समाजाच्या आमदारांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.