नाशिकरोड : अण्णा गणपती नवग्रह मंदिरात चोरी; दानपेट्या फोडून रक्कम लंपास

aana ganpati navgrah mandirat chori

नाशिकरोड (प्रतिनिधी): विहितगाव शिवारातील प्रसिद्ध श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठ मंदिरात आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी दानपेट्या फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. या चोरीत किती दानपेट्या फोडल्या गेल्या आणि किती रक्कम चोरीला गेली याबाबत अद्याप तपशील मिळालेला नाही.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

श्री अण्णा गणपती नवग्रह मंदिर संपूर्ण भारतातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे गणपती उत्सव, संकष्टी चतुर्थी तसेच सुट्ट्यांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मंदिराच्या स्थापनेपासून आजवर येथे कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 2:30 च्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या भिंतीलगत असलेल्या एका छोटे मंदिराचा वापर करून नवग्रह मंदिरात प्रवेश केला आणि काही दानपेट्या फोडून चोरी केली.

घटनेच्या वेळी मंदिराच्या परिसरातील सुरक्षा रक्षकाला आवाज आल्यामुळे त्याने तत्काळ तपासणी केली. या वेळी चोरट्यांनी मंदिरातून पळ काढल्याचे त्याच्या लक्षात आले. सुरक्षा रक्षकाच्या माहितीनुसार, त्याने तीन चोरट्यांना पळताना पाहिले. या घटनेनंतर लगेचच पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. सध्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि त्यांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चोरीमुळे भाविकांमध्ये चिंता
अण्णा गणपती नवग्रह मंदिर भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे. या मंदिरातील चोरीमुळे भाविक आणि परिसरातील लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी आणि चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply