Women Empowerment भगूरमध्ये महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भगूर : समाजातील सर्व महिलांना समान वागणूक मिळावी, त्यांच्या सन्मानात कोणताही कमीपणा येऊ नये, यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या संकल्पनेतून ‘सन्मान ती चा’ या विशेष हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन भगूर येथे करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि झेप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील एकल महिलांसाठी (विधवा) नवा दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘विधवा’ हा शब्द अपमानास्पद असल्याने त्याऐवजी ‘एकल’ किंवा ‘पूर्णागिनी’ असा उल्लेख केला जावा, अशी भूमिका बलकवडे यांनी मांडली. पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या आयुष्यात दुःख असले तरी तिला समाजाने दुय्यम स्थान न देता, सुवासिनींसारखाच सन्मान दिला पाहिजे, अशी या उपक्रमामागील संकल्पना आहे.

भगूर शहरातील सर्व महिलांनी एकत्र येत “पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला कुंकू पुसण्याची, बांगडी, जोडवी आणि मंगळसूत्र काढण्याची आवश्यकता नाही” असा निर्धार घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्यासाठी उपस्थित महिलांनी पूर्णागिनी भगिनींना व्यासपीठावर कुंकू लावून त्यांचा सन्मान केला.
या विशेष हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. सेलिब्रिटी अँकर आदित्य यांच्या उपस्थितीत महिलांनी आनंद घेतला. या उपक्रमातून महिलांमध्ये नव्या विचारांची बीजे रोवली गेली आणि समाज बदलण्याचा संकल्प घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, प्रेमलता राजगुरु, योगिता चव्हाण, सायरा शेख, भोर, वर्षा लिंगायत, भारती बलकवडे, शितल बलकवडे, सुरेखा निमसे, रोहिनी बलकवडे, भारती साळवे, जिजाबाई जाधव, हर्षदा सुर्वे, निशा पुजारी आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.