क्रिकेटपटू चहल आणि धनश्री वर्मा आता अधिकृतरीत्या विभक्त
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या वैवाहिक जीवनातील समस्या चर्चेत होत्या, आणि अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला अधिकृत मान्यता दिली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Yuzvendra chahal and dhanshree varma 18 महिन्यांपासून राहत होते विभक्त
वांद्रे फॅमिली कोर्टात उपस्थित असलेल्या एका वकिलाच्या माहितीनुसार, युजवेंद्र आणि धनश्री यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा अंतिम टप्पा पार करण्यासाठी दोघेही सकाळी 11 वाजता कोर्टात हजर होते.
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात दोघांनीही कबूल केले की, ते 18 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि एकमेकांसोबत राहण्यात अडचणी येत असल्यामुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
कम्पॅटिबिलिटी समस्यांमुळे वेगळे होण्याचा निर्णय
न्यायालयात दोघांना वेगळं होण्याचं कारण विचारण्यात आलं असता, त्यांनी कम्पॅटिबिलिटी (सुसंवाद) समस्यांमुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला अधिकृत मान्यता दिली.
न्यायाधीशांनी संध्याकाळी 4:30 वाजता निकाल सांगितला आणि आजपासून दोघेही वैवाहिक संबंधात नाहीत, असे स्पष्ट केले.
युजवेंद्र चहलने धनश्रीला किती पोटगी दिली?
युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांबरोबरच पोटगीच्या मुद्द्यावरही बरीच चर्चा सुरू होती. धनश्रीने तब्बल 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचे अहवाल समोर आले होते. मात्र, प्रत्यक्षात घटस्फोटावेळी किती पोटगी ठरली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, पण शेवट गाठला वेगळ्याच वळणावर
युजवेंद्र आणि धनश्री यांनी चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सोशल मीडियावरही हे कपल मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. दोघांनीही या विषयावर अधिकृतरीत्या काहीच भाष्य केलं नव्हतं. अखेर आता त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा झाली असून, त्यांच्या चाहत्यांना याचा मोठा धक्का बसला आहे.