नाशिक जिल्ह्यातील १०७ गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत मतदारसंघात प्रवेशबंदी

107 criminals of Nashik district banned from constituencies during election period

नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यातील १०७ गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत मतदारसंघात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली असून त्यांना विशिष्ट कालावधीत मतदारसंघात प्रवेश करण्याची मनाई करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील ४५ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू केल्याने मतदारसंघात शांततेत निवडणूक पार पडावी या उद्देशाने, नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने १०७ संशयित व सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिलेल्या सूचनेनुसार, संबंधितांना नोटीस बजावून मतदारसंघात प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत. हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर तत्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याच्या अंतर्गत उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

४५ सराईत गुन्हेगार हद्दपार, २८६३ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ४५ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. या गुन्हेगारांना विशिष्ट कालावधीसाठी जिल्ह्यातून बाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला असून त्यांच्या जिल्ह्यात पुनःप्रवेशास मनाई आहे. ही कारवाई मतदारसंघातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या लागू झाल्यापासून, जिल्ह्यातील एकूण २,८६३ गुन्हेगार आणि समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.