Nashik: गंधर्वनगरीतील ८ वर्षीय मूकबधिर मुलावर अत्याचार करून खुनाची घटना; परिसरात संतापाची लाट

IMG 20250121 075429

नाशिकरोड: गंधर्वनगरी भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पात राहणाऱ्या ८ वर्षीय मूकबधिर मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. २०) उघड झाली. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik घटनेचा तपशील

रविवारी सायंकाळी मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा बांधकाम सुरू असलेल्या सहा मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ‘डग’मध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. मुलाला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

प्रारंभी मुलाचा मृत्यू उंचावरून पडल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे तसेच पाठीच्या बरगड्या तुटल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Nashik पोलिसांचा तपास वेगात

Nashik उपनगर पोलिस ठाण्याच्या तीन विशेष पथकांनी तपास वेगाने सुरू केला असून घटनास्थळी बारकाईने पाहणी करण्यात आली. इमारतीतील मजुरांची चौकशी सुरू आहे. रविवारी नंतर कोणता पुरुष मजूर गायब झाला आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे.

परिसरातील संताप

मुलावर झालेल्या क्रूर अत्याचारांमुळे गंधर्वनगरीतील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी,” अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी Nashik पोलिसांनी खुनासह पोक्सो (बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी भेट देऊन तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे.

न्यायासाठी नागरिकांचा आक्रोश

या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गंधर्वनगरी भागात वातावरण तणावपूर्ण असून लहान मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी करताना अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.