Nashik : द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर शहर वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मागील दोन आठवड्यात एक हजार बेशिस्तांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यात सर्वाधिक कारवाई विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आणि सिग्नलचे पालन न करणाऱ्यांचा समावेश आहे. द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर १२ तारखेला रात्री भरधाव जात असलेला छोटा टेम्पो सळींनी भरलेल्या ट्रकवर पाठीमागून जाऊन धडकला होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या भीषण अपघातामध्ये आत्तापर्यंत ९ जणांचा बळी गेला आहे. या घटनेपासून शहर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. १३ ते २९ तारखेदरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या ८३७ वाहनचालक आणि सिग्नलचे पालन न करणाऱ्या ८७८ वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकी, रिक्षांना प्रवेश करण्यास मनाई आहे.
तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत प्रवास करणाऱ्या ३६९ दुचाकीस्वार आणि ५० रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या दोन आठवड्यांमध्ये पोलिसांनी विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, ओव्हर लोड, रिफ्लेक्टर नसणे, रिफ्लेक्टर बसविणे, उड्डाणपुलावर मनाई असताना जाणारे दुचाकीस्वार व रिक्षाचालकांसह, विना नंबरप्लेट वाहने असे सुमारे ४ हजार ५९६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याचे संकेत वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत.
दोन आठवड्यातील कारवाई
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे …. ८३७
सिग्नल तोडणे …. ८७८
अवजड वाहतूक…. २०२
रिफ्लेक्टर नसणे …. ११५
रिफ्लेक्टर बसविणे (वाहनांना) …. १०३२
उड्डाणपुलावर दुचाकीप्रवास …. ३६९
उड्डाणपुलावर रिक्षाप्रवास …. ५०
विना नंबरप्लेट …. ५३
अन्य कारवाई…. १०६०