Nashik Crime | West Bengal Police Case | Criminal Caught in Nashik
नाशिक (Nashik Crime News): पश्चिम बंगाल पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला गुन्हेगार सुजॉय बिनल मलिक अखेर नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे.
कार्बन नाका, सातपूर परिसरात तो लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून त्याला अटक केली.
काय आहे प्रकरण?
सुमारे एक महिन्यापूर्वी, पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यातील कालना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुजॉय मलिक यास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले असताना तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला.
पश्चिम बंगाल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तो नाशिकमध्ये लपून बसल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला.
गुंडाविरोधी पथकाची अचूक कारवाई: (Nashik Crime News)
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या टीमने पश्चिम बंगाल पोलिसांकडून मिळालेल्या फोटोवरून कार्बन नाका परिसरात संशयिताला शोधण्याचे काम सुरू केले.
कालना पोलिसांचा शोध चालू असतानाच, संशयित सुजॉय एका ठिकाणी काम करताना आढळला. पोलिसांना पाहताच तो पळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, तसेच अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव, घनश्याम महाले यांनी त्याचा शिताफीने पाठलाग करत ताब्यात घेतले.
त्यानंतर सुजॉय मलिक याला कालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.