Purohit Sangh Nashik News : वस्त्रांतरगृह पाडकामाला विरोध; ‘रामकाल पथ’ प्रकल्पात विश्वासात घेण्याची मागणी

download 67 1

Nashik News (Purohit Sangh Nashik News) | गोदाघाटावरील रामकुंड परिसरातील वस्त्रांतरगृहाच्या पाडकामाला श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने ठाम विरोध दर्शवला आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने आधी नवीन वस्त्रांतरगृह उभारावे आणि त्यानंतरच जुनी इमारत पाडावी, अशी स्पष्ट भूमिका पुरोहित संघाने आयुक्त मनिषा खत्री यांच्यासमोर मांडली. त्याचबरोबर महापालिकेच्या महत्वाकांक्षी ‘रामकाल पथ प्रकल्पा’तही त्यांना विश्वासात घेण्याची मागणी करण्यात आली.

३५० कुटुंबांची परंपरा – पुरोहित संघाची भूमिका

श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या शिष्टमंडळाने ६ ऑगस्ट रोजी आयुक्त खत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात सांगितले की, गेली हजारो वर्षे ३५० हून अधिक पुरोहित कुटुंबे रामकुंड परिसरात धार्मिक विधी, गंगा गोदावरी जन्मोत्सव, गोदावरी महाआरती, त्रिकाल नैवेद्य, सिंहस्थ कुंभ स्नान, कुंभध्वजारोहण ते ध्वजावतरण यासारखी महत्वाची धार्मिक परंपरा जोपासत आहेत.
रामकुंडावर येणारे भाविक, साधुसंत व प्रशासन यांच्यातील मुख्य दुवा पुरोहित संघ असून, सुव्यवस्था व पावित्र्य राखण्यासाठी दरमहा पुरोहित संघ व महापालिका यांच्यात संयुक्त समन्वय बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली.

भाविकांच्या सोयीसाठी सुचना

निवेदनात पुढील महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या –

  • गोदावरीत नेहमी निर्मल जल वाहते राहील याची खात्री
  • गोदाघाट परिसरातील भिकारी व भटक्यांवर नियंत्रण
  • भाविकांसाठी निवाराशेड, पिण्याचे पाणी व शौचालयांची व्यवस्था
  • परिसरात मांस, मासळी व मद्यविक्रीला बंदी
  • सिंहस्थ काळात धार्मिक विधी व काकस्पर्शासाठी स्वतंत्र व्यवस्था
  • दिशादर्शक फलकांची उभारणी
  • धर्मशाळा तसेच रामकुंड व लक्ष्मणकुंडाची साप्ताहिक स्वच्छता

निवेदनावर स्वाक्षऱ्या (Purohit Sangh Nashik News)

या निवेदनावर सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल, मनोज गायधनी, शाम नाचण, प्रफुल्ल गायधनी, अजित गर्गे, बालाजी गायधनी, बंधुजी पाराशरे, सुहास शुक्ल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.