Nashik News | Defence Update 2025 – Tejas Aircraft Nashik – नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) प्रकल्पात तयार होणारे स्वदेशी हलके लढाऊ विमान तेजस मार्क 1ए (Tejas Mk1A) लवकरच आकाशात झेपावणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता हमी महासंचालनालयाने (DGQA) या विमानाच्या उड्डाणाला परवानगी दिली असून, वायुदलाकडे सुपूर्दीचा मार्गही खुला झाला आहे.
नाशिक ‘एचएएल’मध्ये स्वतंत्र प्रॉडक्शन लाइन
स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित तेजसची निर्मिती नाशिकसह बेंगळुरूमध्ये सुरू आहे. ओझर प्रकल्पात यासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च करून स्वतंत्र प्रॉडक्शन लाइन तयार करण्यात आली आहे. एप्रिल २०२३ पासून कार्यरत असलेल्या या लाइनवर दरवर्षी आठ विमानांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. बेंगळुरूमध्ये आधीपासून दोन प्रॉडक्शन लाइन असून, तिथून दरवर्षी १६ विमाने तयार होतात.
वायुदलाच्या वाढत्या गरजांमुळे ओझर येथे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. दीड वर्षांत नवी लाइन तयार करून उत्पादनाला सुरुवात झाली. आता DGQAची मंजुरी मिळाल्याने हे विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल होण्यास सज्ज आहे.
८३ विमानांची मोठी ऑर्डर (Tejas Aircraft Nashik)
एचएएलला ४८ हजार कोटी रुपयांची ८३ तेजस विमानांची ऑर्डर मिळाली आहे, ज्यापैकी १६ विमाने नाशिक प्रकल्पात तयार होणार आहेत. नाशिकमधील पहिले तेजस मार्च २०२५ मध्ये सुपूर्द करण्याचे नियोजन होते; मात्र अमेरिकन जीई कंपनीकडून F404-IN20 इंजिनाच्या पुरवठ्याला झालेल्या विलंबामुळे हे पुढे ढकलले गेले. मार्चपासून इंजिन मिळाल्यानंतर विमानाच्या विविध चाचण्या पूर्ण करण्यात आल्या.
काटेकोर चाचण्यांनंतरच मंजुरी
लढाऊ विमानासाठी डिझाइनपासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर संरक्षण मंत्रालयाचे निरीक्षक निकषांची काटेकोर तपासणी करतात. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच उड्डाणाची परवानगी दिली जाते. तेजसने हा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.
अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
तेजस विमानातून स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची हवेतून हवेत मारा करण्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. २० हजार फूट उंचीवरून डागलेले हे क्षेपणास्त्र लक्ष्यावर अचूक बसले, अशी माहिती संरक्षण तज्ज्ञांनी दिली.