दिंडोरी (नाशिक) Nashik News – दिंडोरीसह आसपासच्या सुमारे २५ किमी परिसरात दुपारी अचानक प्रचंड जोरदार आवाज (Loud Noise) झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आवाजाची तीव्रता इतकी होती की काही घरांच्या काचा फुटल्या, तर अनेकांना मोठा हादरा बसला.
आवाजाचे खरे कारण समोर आले
घटनेनंतर तलाठी, तहसीलदार व पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले की हा आवाज नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्थान अरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या सुखोई लढाऊ विमानाच्या सरावामुळे झाला होता.
सरावावेळी सुखोई विमान जमिनीच्या अगदी जवळून हवेत झेपावले आणि त्यावेळी निर्माण झालेल्या सॉनिक बूममुळे (Sonic Boom) हा भीषण आवाज परिसरभर पसरला.
सॉनिक बूम म्हणजे काय?
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, “सुखोई विमान ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करताना हवेत सॉनिक बूम तयार होतो, ज्यामुळे हा प्रचंड आवाज होतो. यामुळेच काही घरांच्या काचा फुटल्या असाव्यात. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ही कोणतीही दुर्घटना नसून केवळ विमान सरावाचा परिणाम आहे.”
नागरिकांना दिलासा (Nashik News)
पोलिसांनी स्पष्ट केले की, दिंडोरी किंवा परिसरात कोणतीही अनुचित घटना किंवा नुकसान झालेले नाही. HAL कडून नियमित प्रशिक्षण आणि सराव उड्डाणे घेतली जातात. हा त्याचाच भाग होता.