महायुतीत धुसफूस कायम, भाजपचा मोठा निर्णय
BJP :नाशिक पालकमंत्रिपदावर भाजपचीच (BJP) मोहोर, रायगडचा तिढा कायम! : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून मागील अनेक दिवसांपासून महायुतीत तणाव सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी स्थगिती द्यावी लागली होती. या निर्णयामुळे युतीतील अंतर्गत वाद अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर (BJP) भाजपचा दावा कायम
शिंदे गटाने नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा केला होता, मात्र भाजपने हे पद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच रायगडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिले. या निर्णयामुळे शिंदे सेना आक्रमक झाली होती. मात्र, आता भाजपने हा वाद संपवत नाशिकच्या पालकमंत्रिपदी आपलीच मोहोर उमटवली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रभाव
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन हेच नाशिकच्या पालकमंत्रिपदी राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शिंदे गटाची पुढील भूमिका काय?
शिंदे गटाचे वरिष्ठ नेते दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, भाजपच्या निर्णयानंतर ते आता कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रायगडचा तिढा कायम!
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुटला असला तरी रायगडच्या बाबतीत अजूनही निर्णय झालेला नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र बसून हा तिढा सोडवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदी अंतिम निर्णय कधी आणि काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.